Friday, September 23, 2016

इनिग्मा

अॅलन ट्युरिंग, छायाचित्र सौजन्य: विकिपीडिया

उपोद्घात :

अॅलन ट्युरींग नावाच्या गणितज्ञाचे नाव विज्ञानाच्या जवळपास सर्व अभ्यासशाखांतील विद्यार्थ्याच्या ऐकण्यात आलेले असते. कॉम्पुटर सायन्स मधले त्याचे महाकाय योगदान आणि सर्व विद्याशाखांमध्ये वाढत चाललेले कॉम्पुटर प्रतिमानांचे (simulations) महत्व पाहता यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. परंतु सुदैवाने म्हणा की दुर्दैवाने (खरं तर माझ्या मते दुर्दैवानेच) ट्युरींगचा बौद्धीक आवाका हे त्याच्या प्रसिद्धीचे एकमेव कारण नव्हते. वयाच्या सववीसाव्या वर्षी एका नव्या विज्ञानाचा पाया रचणाऱ्या या शास्त्रज्ञाच्या वाटेला समलैगिकत्वामुळे आलेली मानहानी हा राजकीय, धार्मिक आणि मुख्यतः मानवी कृतघ्नपणाचा नमुनाच म्हणायला हवा. "नमुना" यासाठी की राजकारणी आणि धर्म या जोडगोळी मुळे यातना भोगलेला ट्युरींग हा एकमेव प्रतिभावंत नव्हता, ती परंपरा अगदी सॉक्रेटीस पासून (२३०० वर्षांपासून) चालत आलेली आहे. आपण फक्त, एवढीच आशा करू शकतो की या दुर्दैवी प्रज्ञावंतांच्या मांदियाळीतला ट्युरींग हा शेवटचा तारा असावा. यातना वाट्याला येऊनही शेवटपर्यंत एकांतात प्रतिभासाधना करणारऱ्या ट्युरींगचे वैयक्तिक आयुष्य सुद्धा बायरनच्या एखाद्या कवितेचा विषय व्हावा एवढे अनेकपदरी होते. आणि त्याचे वैज्ञानिक कार्य समजावून घ्यायचे असेल तर त्या त्या विषयातल्या शास्त्रज्ञानीच लिहिणे योग्य आहे. २०१३ मध्ये (ट्युरिंगच्या मृत्यू नंतर ५० वर्षांनी) वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये कार्यरत असणाऱ्या वेगवेगळ्या विषयातल्या तब्बल सत्तर शास्त्रद्न्यांनी ट्युरींगच्या "निवडक" संशोधनाचा आढावा घेणारा हजारपानी ग्रंथ प्रकाशित केला, यावरून त्याचा विस्तार लक्षात येईल. ज्यांना विशुद्ध गणित, सैद्धांतिक संगणकशास्त्र, कृत्रिम बुद्धीमत्ता, सैद्धांतिक जीवशास्त्र किंवा संबंधीत विषयांची आवड आहे त्यांनी मूळ ग्रन्थ डोळ्याखालून घालायला हरकत नाही ("अॅलन ट्यूरींग - हिज वर्क अँड इम्पॅक्ट", ले. : कूपर आणि लिवेन, एल्सवियर प्रकाशन, २०१३). 

परंतु ट्युरिंगच्या संशोधनाचा आढावा हा या लेखाचा विषय नाही, तर त्याच्या उण्यापुऱ्या ४१ वर्षाच्या आयुष्यातील तिशीच्या आसपासच्या ३-४ वर्षात केलेले संशोधन  हा आहे. आधीचेच नाट्य कमी म्हणून की काय हा काळही नेमका दुसऱ्या महायुद्धाच्या वेळचा आहे. परिणामी या कथेकडे एखाद्या हॉलिवूड निर्मात्याचे लक्ष गेले नसते तरच नवल, २०१४ मध्ये ट्यूरींगच्या जीवनावर आधारित 'दी इमिटेशन गेम' हा चित्रपट प्रदर्शित झाला. 'बेनेडिक्त कम्बरबॅच'ने यात ट्यूरींगची  भूमिका केली होती. थोडक्यात सांगायची तर त्या कालखंडाची कथा पुढील प्रमाणे आहे: १९३८ च्या सुमारास पी.एच.डी. संपवून ट्युरिंग ब्रिटिश सिक्रेट सर्व्हिस मध्ये रुजू झाला.

"त्याचा पी.एच.डी. चा प्रबंध (सिस्टिम्स ऑफ लॉजिक बेस्ड ऑन ऑर्डिनल्स) ही खरं तर गणितातल्या 'ग्योडेलच्या अपूर्णतेच्या प्रमेयाचीच' संगणक शास्त्रीय आवृत्ती आहे. गणितातील काही विशिष्ठ प्रकारांतल्या समस्या सोडविण्यासाठी आज्ञावली (algotithms) तयार करता येतात हे त्यात दाखवून दिलेले होते. या प्रबंधातील तर्कशास्त्राचा भाग हा आधुनिक सैद्धांतिक संगणक शास्त्राचा महत्वाचा घटक मानला जातो. प्रिन्स्टन विद्यापीठाच्या विद्यापीठाच्या वेब अर्काइव्हज वर हा प्रबंध उपलब्ध आहे."

असो, तर ब्रिटिश सिक्रेट सर्व्हिस मध्ये ट्युरिंग काम करत असलेला GCCS विभाग जर्मन नाझी सैन्याचे रेडिओ संदेश पकडत असे. हे संदेश अर्थातच सांकेतिक लिपी मध्ये असत. त्या संदेशांचा अर्थ लावायचं काम ट्यूरींगच्या गटाकडे सोपविण्यात आलं. हे काम अत्यंत अवघड का होतं, आणि ते त्यांनी कसं केलं या विषयी हा लेख आहे. 

इनिग्मा मशीन्स

१९३८ च्या बरंच आधी पासून जर्मनी मध्ये "इनिग्मा" नावाची यंत्रे प्रसिद्ध होती. ही यंत्रे साध्या संदेशाचे सांकेतिक भाषेत रूपांतर करीत असत. आता सांकेतिक लिपी म्हणजे काय, तर मूळ संदेश घ्यायचा आणि त्यातील अक्षरांच्या जागी दुसरी अक्षरे टाकायची. एका अक्षराच्या जागी दुसरे कोणते अक्षर घालायचे याचा एक नियम ठरवून घेतला की झाली आपली सांकेतिक लिपी तयार (खरं तर, ही सांकेतिक लिपी तयार करण्याची फक्त एक पद्धत झाली!). उदाहरणार्थ हा नियम वापरून पाहू:
a च्या जागी b टाकायचा ...
b च्या जागी c टाकायचा ...
...
...
...
y च्या जागी z टाकायचा ... आणि
z च्या जागी पुन्हा a टाकायचा ...
हा नियम वापरला तर;
"Here is a normal English message" या संदेशाच रूपांतर  
"Ifsf jt b opsnbm Fohmjti nfttbhf" असं होईल.

परंतु हा अगदी सोपा नियम झाला, इंग्रजी भाषेची काही वैशिष्ठे माहीत असतील (उदाहरणार्थ: E हे अक्षर सर्वात जास्त वेळा येणे; नामाच्या सुरुवातीचे अक्षर कॅपिटल असणे; शब्दांचे वितरण इत्यादी) तर मूळ संदेश अगदी सहज ओळखता येईल. या पद्धतीचा मुख्य दोष असा की मूळ संदेशामधले एका अक्षराचे रूपांतर सांकेतिक लिपीमध्ये होताना त्याचे दुसरे कुठले तरी अक्षर बनते, परंतु बनणारे अक्षर एकच असते. म्हणजे मूळ संदेशामध्ये दहा वेळा a असेल तर त्याचे रूपांतर निश्चितपणे दहा b मध्येच होईल; "पाच वेळा b, तीन वेळा c आणि दोन वेळा f" मध्ये होणार नाही. हा एक मोठाच दोष आहे.

इनिग्मा यंत्राचे भाग, छायाचित्र सौजन्य: विकिपीडिया
इनिग्माची प्रक्रिया मात्र सर्व पातळ्यांवर वेगळी होती. इनिग्मामध्ये तयार केलेला सांकेतिक संदेश मूळ संदेशापेक्षा खूपच वेगळा असे. मूळ संदेशात एकच अक्षर दोनदा आलं तरीही त्याचं दोन वेगवेगळ्या सांकेतिक अक्षरात रूपांतर होऊ शकत असे. यावर कडी म्हणजे इनिग्मा मध्ये "स्पेस-बार" नव्हता. त्यामुळे शब्द वेगवेगळे ओळखता येत नसत आणि मूळ संदेश ओळखणं अजूनच किचकट होत असे. अश्या प्रकारचे संदेश भेदण्यासाठी गणितामध्ये काही पद्धती आहेत, परंतु १९३० च्या दशकात उपलब्ध असलेल्या पद्धतींचा वापर करून या संदेशांचा अर्थ लावणं कोणालाच शक्य झालं नव्हतं. ही यंत्रे जर्मनीमध्ये विक्रीसही उपलब्ध असंत. त्यामुळे बँकेचे आर्थीक व्यवहारासंबधीचे तपशील, व्यक्तिगत व्यवसायाचे ठराव वगैरे कोठे पाठवायचे असतील; तर ते आधी इनिग्मा मधून सांकेतिक भाषेत तयार करून घेऊन मग पाठवले जात असंत. अशी ही इनिग्मा यंत्रे युद्ध सुरु झाल्या नंतर जर्मन सैन्याने सुद्धा वापरायला सुरुवात केली; यात काही आश्चर्य नव्हत. विक्रीस उपलब्ध असलेलीच यंत्रे थोडी जास्त जटील करून जर्मन सेना वापरत असे. आधीच अर्थ लावायला अवघड असलेली यंत्रे थोडीफार सुधारणा करून पूर्णतः अभेद्य होतील असा जर्मनांचा समज झाला असणारच. त्यांचं एका अर्थाने बरोबरही होतं, परंतु त्यांच्या प्रक्रीयेमध्ये असलेला एक गंभीर दोष तोपर्यंत कोणाच्याही लक्षात आला नव्हता. याच दोषाचा फायदा घेऊन इनिग्माच्या तटबंदीला ट्युरिंगने गणिताच्या साहाय्याने खिंडार पाडले, आणि क्रिप्टोलॉजी या विद्याशाखेमध्ये एक नवीन पर्व सुरु झाले, ते कसे ते पुढे येईलच. परंतु ते समजून घेण्याआधी इनिग्मा यंत्राची रचना समजावून घेऊ. 

नाझी सैन्याच्या आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स मध्ये वापरल्या जाणाऱ्या इनिग्मा मशीन्स मध्ये थोडाफार फरक असला तरी प्रातिनिधिक रचना एकच होती. वरील चित्रामध्ये सर्वसाधारण इनिग्माची बाह्य रचना दाखविली आहे. त्याचे खालील वेगवेगळ्या भागांमध्ये विभाजन करता येईल;

१) इनपुट कीबोर्ड 

यात सव्वीस अक्षरे असतात, स्पेस-बार वगळून. मूळ संदेश यात टाईप केला जातो

२) प्लग बोर्ड 

हा मशीनचा समोरचा भाग, जुन्या टेलिफोन स्विचबोर्ड सारखा दिसतो. यावर १० प्लग लावलेले असतात. त्यातला प्रत्येक प्लग २-२ अक्षरांना जोडतो. त्यामुळे सव्वीस पैकी २० अक्षरांची अदलाबदली होते, ही २० अक्षरे कोणकोणती असतील हे अर्थातच मशीन वापरणाऱ्याच्या मनावर असते. त्यामुळे हा प्लग बोर्ड सांकेतिक लिपीची क्लिष्टता अब्जावधी पटींनी वाढवतो. कसा ते पाहू: 
आपल्या कडे १० प्लग आहेत आणि २६ अक्षरे आहेत, एक प्लग दोन अक्षरे जोडतो. त्यामुळे पहिल्या प्लगला २६ पर्यायांमधून २ पर्याय निवडायचे आहेत, याचे ३२५ मार्ग असतात. पुढच्या प्लगला उरलेल्या २४ मधून २ पर्याय निवडायचे आहेत, त्याचे असतात २७६ मार्ग. असं करत-करत दहाही प्लग चे जोडण्याचे मार्ग शोधून काढले कि एकूण पर्यायांची संख्या होते १,५०,७३८,२७४,९३७,२५० ! ही सोळा आकडी संख्या आहे. म्हणजे फक्त २६ अक्षरांचा प्लग बोर्ड जोडण्याचे एवढे प्रचंड पर्याय आहेत. यात पुढे कशी वाढ होते ते पाहू.


३) तीन चक्राचा (रोटर्सचा) संच 

हा संच मशीनच्या दर्शनी भागात असतो. यातील प्रत्येक चक्राच्या परिघावर a ते z अशी अव्वीस अक्षरे लिहिलेली असतात. इनपुट कीबोर्ड वर एक बटन दाबले की या संचातले सर्वात डावीकडचे चाक एक घर पुढे सरकते (म्हणजे आधी a असेल तर b ला जाते). २६ घरे पुढे सरकली की (म्हणजे २६ अक्षरे कीबोर्ड वर दाबली की) या चाकाचा १ फेरा पूर्ण होतो (अर्थातच). यानंतर पुढचे अक्षर कीबोर्ड वर दाबले असता डावीकडून दुसरे चाक एक घर पुढे सरकते. अश्या प्रकारे या दुसर्या चाकाचा एक फेरा पूर्ण झाला की तिसरे चाक एका घराने पुढे सरकते. थोडक्यात दुसरे चाक एकदा फिरण्यासाठी पहिल्या चाकाला २६ वेळा फिरावे लागते आणि तिसरे चाक एकदा फिरण्याचा साठी दुसऱ्या चाकाला २६ वेळा फिरावे लागते (म्हणजेच पहिल्या चाकाला २६ x २६ = ६७६ वेळा फिरावे लागते). 
हे थोडंसं घड्याळाच्या काटयांसारखंच आहे; मिनिट काट्याचा एक फेरा होण्यासाठी सेकंड काट्याला ६० फेरे मारावे लागतात. आणि तास काट्याचा एक फेरा होण्यासाठी मिनिटकाट्याला ६० फेरे आणि सेकंड काट्याला ६० x ६० = ३६०० फेरे मारावे लागतात.
या प्रत्येक चक्रांमध्ये क्लिष्ट वायरिंग असते, ती चक्राच्या प्रत्येक घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारे जोडली जाते. एक चाक फक्त एक घर जरी पुढे सरकल तरी पूर्णतः वेगळी जोडणी होऊन जाते. अशी तीन चाके, आणि प्रत्येक चाकाला २६ घरे सरकण्याचा वाव वगैरे गोष्टी लक्षात घेतल्या तर ही वायरिंग २६ x २६ x २६ = १७,५७६ वेगवेळ्या प्राकारे होऊ शकते हे लक्षात येईल. शिवाय ही तीन चक्रे कोणत्या क्रमाने लावायची हे तर पूर्णतः वापरणार्याच्याच हातात! तीन चक्रे ६ वेगवेगळ्या क्रमाने लावता येणं शक्य असतं, त्यामुळे वायरिंगची १७ हजाराची संख्या एकदम एक लाखावर पोचते (१७,५७६ x ६ = १,०५,४५६).
याउपर ही अजून क्लिष्टता वाढवायची म्हणून जर्मनांनी आणखी डोके लढवून एक कल्पना काढली होती. सुरुवातीच्या काळात मिळणाऱ्या इनिग्मा सोबत तीनच चक्र मिळत असत. सैन्याच्या इनिग्मासोबत मात्र पाच चक्रे येत असतं. ५ पैकी कोणतीही ३ चक्रे कोणत्याही क्रमाने वापरता येत असल्याने सहाजिकच किचकटपणा (काठिण्य नव्हे) आणखी १० पटीने वाढत असे. म्हणजे असा,
पाच पैकी तीन चक्रे १० वेगवेगळ्या प्रकारे निवडता येतात ("अ, ब, क, ड, इ" या पाच अक्षरांच्या संचातून ३ अक्षरांचा संच निवडून बघा, १० वेगवेगळे संच निवडता येतील.). या तीन चक्राचे सहा क्रम लावता येतात आणि प्रत्येकी चाकाला २६ घरे असतात, म्हणजे एकूण वायरिंगची संख्या तब्बल  दहा लाखावर पोचते (१० x ६ x १७,५७६ = १,०५४,५६०).
याचा अर्थ असा; की एखादा संदेश इनिग्माला दिला की त्यामध्ये बदल होण्याचे दहा लाखावर मार्ग उपलब्ध असतात. आणि हे फक्त तीन चाकांमुळे, पुढच्या प्लग बोर्ड मुळे होणारे बदल यात विचारात घेतलेले नाहीत. हा प्लग बोर्ड जोडण्याचे वेगवेगळे पर्याय विचारात घेतले तर; उपलब्ध पर्यायांची संख्या होते (१,५०,७३८,२७४,९३७,२५०) x (१७,५७६) = १,५८,९६२,५५५,२१७,८२६,३६०,०००!!
ही संख्या २१ आकडी आहे. हिच्या महाप्रचंड पणाचा अंदाज येण्यासाठी ही तुलना पहा. आपल्या आकाशगंगेमध्ये असलेल्या सर्व तार्यांची संख्या फक्त १२ आकडी आहे... म्हणजे आपल्या आकाश गंगेसारख्याच १६० करोड आकाशगंगा घेतल्या तर त्यामधील ताऱ्यांची एकत्रीत संख्या कशीबशी इनिग्माच्या उपलबद्ध पर्यायांच्या आसपास पोचेल !!! 

४) आउटपुट

हा सव्वीस दिव्यांचा संच असतो, प्रत्येक दिव्यावर a ते z अशी नावे दिलेली असतात. चक्र आणि प्लग बोर्ड यांच्यामध्ये उलटापालट होऊन जे काही अक्षर शेवटी मिळेल, ते लिहिलेला दिवा पेटतो आणि आपल्याला सांकेतिक लिपी मधले अक्षर मिळते. 
  
वरचा भाग थोडा लांब झाला आहे, परंतु इनिग्माची सांकेतिक लिपी भेदणे किती अवघड आहे (खरं तर, "होते" असा भूतकाळ वापरायला हवा) याचा अंदाज यावा म्हणून तो लिहिलेला आहे. आता मशीनचे कार्य पाहू, ते तुलनेनं सोपं आहे.  प्रथम, आपल्याला पाठवायचा संदेश कीबोर्ड वर टाईप केला जातो.

१) कीबोर्डचे एक अक्षर दाबले (समजा a) की बॅटरीचा करंट प्लग बोर्ड कडे जातो

२) प्लग बोर्ड वर ते अक्षर दुसर्या एखाद्या अक्षराला जोडलेले असेल (समजा b ला) तर करंट त्या अक्षरातून (b मधून) चक्राकडे जातो, आणि समजा प्लग बोर्ड वर ते अक्षर कशालाही जोडलेले नसेल तर करंट a मधूनच चक्राकडे जातो.

३) तीन चक्रांच्या अंतर्गत वायरिंग नुसार कोणत्यातरी एका अक्षराकडे करंट जातो (समजा c) आणि शेवटच्या चक्राकडून पुन्हा प्लग बोर्ड वरील त्या अक्षराकडे (या उदाहरणात c कडे) करंट येतो. आणि पहिले चाक एक घर पुढे सरकते (आणि समजा त्याचा वेढा पूर्ण झालेला असेल तर त्याच्या पुढचे चाकही एक घर पुढे सरकते, तेच तिसऱ्या चाकालाही लागू). 

४) समजा प्लग बोर्ड वरचे ते अक्षर दुसर्या अक्षराला जोडलेले असेल (समजा d ला) तर करंट आउटपुट वरच्या त्या अक्षराकडे (म्हणजे इथे d कडे) जातो, अन्यथा मूळ अक्षराकडे (या उदाहरणात c कडे) जातो. 

५) आउटपुट वरचा संबंधित दिवा (c किंवा d) पेटतो आणि आपल्याला सांकेतिक अक्षर मिळते.  
 
इथे लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट म्हणजे, प्रत्येक अक्षर दाबल्यानंतर चकरांची एक घराने हालचाल होते. म्हणजेच टाईप करायला सुरुवात करण्याआधी चाकांची जी रचना असेल त्यावर आणि प्लग बोर्डच्या केलेल्या रचनेवर येणारे उत्तर अवलंबून असेल. या रचनेला इनिशियल सेटिंग असे नाव आहे. पुढची पायरी म्हणजे हे आलेले उत्तर जर सारख्याच इनिशियल सेटिंग्स ठेऊन इनिग्मा वर पुन्हा टाईप केले की मूळ संदेश परत मिळतो. परंतु वरती लिहिल्याप्रमाणे इनिशियल सेटिंगचेच पर्याय प्रचंड (१,५८,९६२,५५५,२१७,८२६,३६०,०००) असल्याने, मूळ अक्षर सेटिंग्स माहीत असल्याशिवाय "ओळखणे" हे जवळपास अशक्य काम होते. एका बाजूने गणिताचे एखादे प्रमेय आत सारावे आणि दुसरीकडून एखादे आधुनिकोत्तर काव्य बाहेर पडावे असा हा मामला होता. या वेबसाईटवर इनिग्मा यंत्राचे प्रतिरूप आहे. आपल्याला हवी ती सेटिंग्स देऊन, आपल्या संदेशाचे सांकेतिक भाषेत रूपांतर करता येते. आणि ते रूपांतर होताना कोणती वायरिंग निवडली गेली ते पाहता येते. आलेला संदेशच जर परत इनपुट म्हणून दिला, तर मूळ संदेश परत मिळतो. इनिग्माची अंतर्गत रचना समजावून घेण्यासाठी याचा वापर करता येईल.  
 

ट्युरिंगची पद्धत:

जर्मन सेनेच्या मुख्यालयातून युद्ध आघाडीवर संदेश पाठविण्यासाठी या तंत्राचा वापर केला जात असे. दोस्त राष्ट्रांनी हे संदेश जरी पकडले तरी त्याचा काहीही उपयोग होत नसे. कारण मिळालेले संदेश ही रोमन अक्षरांची एक निरर्थक मालिकाच असायची. अर्थात ज्याला इनिग्माचे सेटीन्ग्स माहीत नाहीत त्याच्यासाठी ती निरर्थक, नाझी अधिकारी मात्र त्यातून अर्थ काढून त्यानुसार कार्यवाही सुद्धा करत असत. त्यासाठी जर्मनीच्या मुख्यालयातली आणि युद्धआघाडीवरची इनिग्मा मशीन्स एकाच सेंटिंग्स मध्ये चालविली जात असत. ही सेटीन्ग्स रोज पहाटे सहा वाजता बदलली जात असत. दररोज कोणते सेंटिंग वापरायचे हे लिहिलेला कागद प्रत्येक आघाड्यांवरील अधिकाऱ्यांकडे दर महिन्याला दिला जात असे. दोस्त राष्ट्रांना चुकून एखादा कागद सापडलाच तरीही तो फक्त महिनाभरासाठीच चालत असे, शिवाय आपली सेटिंग्स चोरीला गेली आहेत असा संशय जरी आला तरी नाझी अधिकारी सेटिंग्स बदलून टाकत असत. नाझी सेना एका मागून एक देश काबीज करत चालली होती आणि या सततच्या युद्धामुळे ब्रिटिश अर्थव्यवस्था मोडकळीला आली होती. अन्नधान्याचा भयानक तुटवडा पडला होता. अमेरिकेकडून इंग्लंडला येणाऱ्या अन्नधान्याच्या जहाजांना नाझी सैन्य बुडवून टाकत होते. आपल्या जहाजांवर कोठून हल्ला होणार आहे हे कळायला ब्रिटिशांना मार्ग नव्हता, कारण इनिग्माचे अगम्य संदेश! युद्ध हे नेहमीच अनेक पातळ्यांवर लढलं जातं, प्रत्यक्ष सैन्य, त्याला पुरविली जाणारी रसद आणि दारुगोळा, राजकीय आणि आंतरराष्ट्रीय डावपेच आणि गुप्तवार्ता विभागातले तंत्रज्ञ. यापैकी कोणाचा सहाभाग जास्त हे तत्कालीन परिस्थितीच ठरवत असते. इंग्लंडची तेंव्हाची आर्थिक हालाखी आणि आघाड्यांवरचे अपयश पाहता युद्ध जेवढे लांबेल तेवढे जास्तच नुकसानकारक ठरणारे होते. आणि असे आर्थिक खाईत लोटणारे युद्ध लढून जिंकण्यापेक्षा टाळलेलेच बरे. खरे पाहता कोणतेही युद्ध टाळलेलेच बरे, पण नाझी सैन्याच्या जगभर चाललेल्या विकृत कारवाया पाहता हा पर्याय दोस्त राष्ट्रांसाठी आत्मघातकीच ठरला असता. अश्या टेकीला आलेल्या परिस्थितीमध्ये ट्युरिंगने ब्रिटिश सिक्रेट सर्व्हिस मध्ये प्रवेश केला होता आणि त्याच्या मदतीला वेगवेगळ्या क्षेत्रातल्या हुशार शास्त्रज्ञांचं पथक होतं. 
 
इनिग्माचे संदेश मूळ रूपात आणण्याचे प्रयत्न ट्युरिंगच्याही बरेच आधीपासून (१९३२ पासून) सुरू होते. इनिग्माच्या चाकांमधील वायरिंग आपण पुन्हा तयार करू शकलो तर कदाचित आपल्याला संदेश ओळखता येईल अशी काही पोलिश गणितज्ञांची समजूत होती. एका अर्थाने ते बरोबरही होतं परंतु प्लग बोर्डची रचना ओळखण्याचा भाग तरीही शिल्लक राहात होता. चाकांची वायरिंग शोधण्याची पद्धत रेजेवस्की नावाच्या गणितज्ञाने तयारही केली होती. १९३२ मधले इनिग्मा मशिन्स समोरचा प्लगबोर्ड वापरात नसत, त्याकाळात ती पद्धत चालायची. परंतु जसा जर्मन सैन्याला संशय आला तसा त्यांनी इनिग्माला प्लगबोर्ड बसवला. फक्त या एका बदलामुळे त्याची क्लिष्टता लाखो अब्ज पटीने वाढली आणि रेजेवस्कीची पद्धत एका झटक्यात टाकाऊ बनली. परंतु इनिग्मा मशीनचे एक वैशिष्टय रेजेवस्कीचीच्या लक्षात आले होते ते म्हणजे एख्याद्या अक्षराचे रुपांतर त्याच अक्षरात कधीच होत नाही (म्हणजे a चा aच होत नाही). हे वाचायला विशेष काहीच वाटत नाही पण क्रिप्टोलॉजीच्या दृष्टीने हा एका खूप मोठा दोष आहे आणि याच दोषामुळे ट्युरिंग इनिग्माला भेदू शकला. 
 
ट्यूरींगच्या पुढचे आव्हान फक्त नवी पद्धत तयार करणे हे नव्हते तर टिकाऊ असलेली पद्धत तयार करण्याचे होते. मशीनच्या रचनेत थोडाफार बदल झाला तरीही ती पद्धत चालायला हवी होती. एका मागून एक सेटिंग्स वापरून पाहायची झाली असती, आणि सेकंदाला एक सेटिंग तपासले असते तरी सगळ्या सेटिंग्स तपासायला "५ वर १२ शून्य" एवढी वर्षे लागली असती (तुलनेसाठी; आपल्या पृथ्वीचे सध्याचे वयही यापेक्षा १००० पट कमी आहे, एवढेच काय सबंध विश्वाचे वयही यापेक्षा साधारण ४०० पट लहान आहे). असे अवाढव्य गणित समोर आल्यानंतर कोणीही हातपाय गाळेल, परंतु वैज्ञानिक पद्धतीचा पहिला धडा म्हणजे गुंतागुंतीच्या मोठ्या समस्येचे कमी गुंतागुंतीच्या अनेक समस्यांमध्ये रूपांतर करणे. एका पाठोपाठ एक समस्या सोडवत नेल्या की मोठी समस्याही सरतेशेवटी सुटते. याठिकाणी एक काळजी घेणे गरजेंचे आहे की तयार केलेल्या लहान समस्याही ठराविक वेळात सोडवता यायला हव्यात, खरं तर हेच वैज्ञानिकाचे कौशल्य आहे. नाहीतर एकामागून एक सेटिंग्स तपासण्यातली गत व्हायची. 
 
ट्यूरींगची पद्धत नेमकी याच पातळीवर वेगळी होती. त्याने सोपे तर्कशास्त्र वापरले; आतापर्यंत जे संदेश चुकूनमाकून किंवा सेटिंग्स कळाल्यामुळे ओळखता आलेले आहेत त्यामध्ये पहाटेचा संदेश कायमच "हवामानाच्या अंदाजाचा असायचा" (जर्मन मध्ये Der Wetterbericht) आणि प्रत्येक संदेशाच्या शेवट हिटलरचा जयजयकार असायचा. आता सकाळच्या संदेशामध्ये Der Wetterbericht किंवा हिटलर हे शब्द नेमके कोठे आहेत हे ओळखणं कौशल्याचं काम होत कारण स्पेसबार नसल्याने सगळे शब्द जोडून येत असत. येथे रेजेवस्कीने ओळखलेला इनिग्मा चा दोष कामाला आला;  आलेल्या संदेशामध्ये; Der Wetterbericht हा शब्द फक्त त्याच ठिकाणी असणं शक्य आहे, जेथे त्या शब्दातली कोणतीही अक्षरे नाहीत. ही चाळणी लावल्या नंतर ते ते शब्द कोठे आहेत ते कळणं शक्य झालं. उदा. खालील संदेश आपल्याला मिळाला आहे. 
मिळालेला संदेश    Q Z O R Q D H P D X Q B F D L R C T K C M 
ओळखलेला संदेश  D E R W E T T E R B E R I  C H T _  _  _  _  _  
शेवटच्या जागा रिकाम्या आहेत. आता मिळालेल्या संदेशामध्ये "Der Wetterbericht" हा शब्द फक्त त्याच ठिकाणी येणे शक्य आहे. कारण दुसऱ्या ठिकाणी काही अक्षरे सारखीच असतील जे रेजेवस्कीच्या म्हणण्यानुसार शक्य नाही. आता पुढचा टप्पा आहे सेटीन्ग्स ओळखण्याचा. त्यासाठीची ट्युरिंगची पद्धत थोडीशी लांबलचक पण करता येण्याजोगी होती. वर लिहिल्या प्रमाणे, इनिग्माची रचना अशी आहे की टाईप केलेले प्रत्येक अक्षर तीन टप्प्यांवर बदलते १) प्लग बोर्ड नंतर २) तीन चक्रांचा संच आणि पुन्हा ३) प्लग बोर्ड. वरच्या उदाहरणामध्ये D चा Q झाला हे आपण ओळखलेले आहे 
आता D चा Q होताना कोणते बदल झालेले असतील? काही अंदाज करून पाहू, उदा. 
 
इनपुट (D) --> प्लगबोर्ड (अंदाज T) --> चक्रे (अंदाज P) --> आउटपुट (Q)

आपला प्लगबोर्डचा अंदाज बरोबर असेल तर D-T जोडलेले असतील तर असे अनुमान येते की P-Q हे जोडलेलेच हवेत. यातलीच पुढची अक्षरे ओळखताना समजा P-Q या जोडी ऐवजी P ला T जोडला आहे असे अनुमान आले, तर आपले पहीले सर्व अंदाज चुकीचे होते असे सिद्ध होईल. तस्मात आपल्याला वेगळे अंदाज करावे लागतील, समजा पुढचा अंदाज D-T ऐवजी D-S असा करता येईल. असे सर्व (एकूण २५) अंदाज करून पाहिले की अश्या जोड्यांचे जुळणारे काही संच मिळतील. समजा २५ चे २५ अंदाज जुळले नाहीत की क्रांचा अंदाज बदलावा लागेल. ही सगळी आकडेमोड करून जुळणारे काही हजार सेटीन्ग्स मिळतील. हजार ही मोठी संख्या आहे, तरीही "१,५८,९६२,५५५,२१७,८२६,३६०,०००" पेक्षा ती खूप लहान आहे. तरीही हजार सेटिंग्स तपासण्यासाठी यंत्रच हवे जे विजेवर चालेल आणि ट्युरिंगची पद्धत वापरून योग्य ती सेटिंग्स देईल. इनिग्माच्या चक्रासारखीच छत्तीस चक्रे जोडून हे यंत्र १९३९ मध्ये तयार करण्यात आले. वरती दाखवलेली सर्व आकडेमोड करून हे यंत्र साधारण अर्ध्या तासात योग्य उत्तर देत असे. रेजेवस्कीच्या यंत्राच्या सन्मानार्थ या यंत्राला बॉम्ब मशीन असे नाव देण्यात आले.   
 
आजकालच्या सुपर कॉम्पुटर्सच्या जमान्यात बॉम्ब मशीनला लागणारा अर्धा तास हा वेळ खूप जास्त वाटू शकेल. परंतु साध्या ट्रान्सिस्टरचा आकारही मोठ्या बल्ब एवढा होता त्या काळात कॉम्पुटर सारखेच यंत्र तयार करून त्यावर एवढी महाप्रचंड आकडेमोड करून इनिग्मा सारखा प्रचंड क्लिष्ट गडबडगुंडा सोडवण्याचा भीमपराक्रम खरेच स्तिमित करणारा आहे, आणि त्याच वेळी आपले पाय जमिनीवर ठेवायला लावणारा आहे.

Saturday, August 29, 2015

होमिओपॅथी : उपचार की फसवेगिरी ?

(हा लेख मी आणि माझा मित्र स्नेहल शेकटकर याने एकत्र मिळून लिहिला आहे. स्नेहलचे अनेक आभार.)
आपल्या आजूबाजूला बरेच लोक ॲलोपॅथी ऐवजी होमिओपॅथी नावाची उपचारपद्धती अवलंबताना दिसतात आणि बरेच लोक या पद्धतीचे समर्थन देखील करताना दिसतात. या करिताच हा लेखाचा प्रपंच. तुम्ही जरी होमिओपॅथीचे समर्थक असाल तरी हा लेख पूर्ण वाचावा अशी आमची विनंती आहे. आम्ही स्वत: होमिओपॅथीचे संपूर्ण विरोधक आहोत आणि आमची अशी अपेक्षा आहे की हा लेख वाचल्यानंतर तुम्हीदेखील होमिओपॅथीकडे वैज्ञानिक दृष्टीकोनातून बघाल, जर असे झाले नाही तर एकतर आमच्या किंवा मग तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये मोठीच गडबड आहे हे नक्की!
इ.स. १७९६ साली सॅम्युअल हानेमन (Samuel Hahnemann) या जर्मन व्यक्तीने होमिओपॅथीची सुरुवात केली. एखाद्या निरोगी व्यक्तीमध्ये जर एक विशिष्ट घटक (उदा. एखादे रसायन) व्याधी तयार करत असेल तर तोच घटक ती व्याधी झालेल्या व्यक्तिला निरोगी बनवू शकते अशी (आमच्या मते अजब!) होमिओपॅथीची पहिली समजूत आहे. थोडक्यात "क्ष" या घटकामुळे ताप येत असेल, तर तापावर ऊपचार म्हणूनही "क्ष"हाच घटक वापरायचा. हानेमनने ही समजूत कोणताही वैज्ञानिक पद्धती न वापरता स्वत:च्या लहानश्या अनुभवावरून ठरवली होती, आणि त्यानंतरही आजतोपावेतो कोणालाही ही समजूत वैज्ञानिक साच्यात बसेल अशा पद्धतीने सिद्ध करता आलेली नाही. मात्र बऱ्याच लोकांचा याला प्रचंड पाठींबा आहे असे आम्हाला दिसून आले आहे. काट्याने काटा निघतो किंवा विषच विषाला बरे करते असा सरळधोपट तर्क हे लोक मांडतात. हा न्याय जर सगळ्या बाबतीत सत्य आहे असे माणायचे असेल तर मग विष प्यायलेल्या व्यक्तिला अजून विष पाजून बरे करता यायला हवे! विज्ञान अशा विचित्र कल्पनांवर चालत नाही. एवढे मोठे जहाज पाण्यात बुडत नाही तर मग एखादा छोटा दगड कशाला बुडेल हा तर्क जितका हास्यास्पद आहे तेवढाच हास्यास्पद होमिओपॅथीचा हा दावा आहे. जहाज बुडत नाही आणि दगड बुडतो याचे कारण सुद्धा विज्ञानातील सखोल आणि संख्यात्मक (Quantitative) विवेचन करून द्यावे लागते. केवळ गुणात्मक (Qualitative) तर्कवादाला विज्ञानात जवळपास काहीही किंमत नाही.
आधुनिक वैद्यकशास्त्रात काही प्रकारच्या सूक्ष्मजीवाणुंमुळे (Bacteria) होणाऱ्या आजारांवर औषध म्हणून प्रतीजैवके (Anti-biotics) वापरली जातात, ज्यामध्ये रक्तातील पांढऱ्या पेशींचे प्रमाण वाढवण्यासाठी मृतप्राय झालेले सूक्ष्मजीवाणूच औषध म्हणून वापरले जातात. तसेच लहान मुलांना पोलिओ किंवा देवीच्या लसी दिल्या जातात त्यामध्येही लहान वयातच रोगांविरुद्ध प्रतिकारशक्ती तयार व्हावी म्हणून त्याच (किंवा त्याच्या सारख्या) रोगांच्या मृतप्राय जंतूचे जैविक द्रावण लस म्हणून दिले जाते (शाळेत ऐकलेली एडवर्ड जेन्नरची कथा आपल्याला आठवत असेलच). अर्थातच आधुनिक वैद्यकशास्त्रातील या दोन्ही गोष्टी विज्ञानातील सर्व प्रकारच्या काटेकोर कसोट्यांवर तपासल्या गेलेल्या आहेत, आणि जे आजार सूक्ष्मजीवाणुंमुळे होत नाहीत त्यासाठी या पद्धती औषध म्हणून चालतही नाहीत. होमिओपॅथीमध्ये मात्र मूतखड्यापासून ते मधुमेहा पर्यंत सर्वच आजारांवर बेधडकपणे "काट्याने काटा काढावा" ही विक्षिप्त समजूत वापरली जाते. होमिओपॅथीचे व्यावसाईक त्यांच्या समर्थनार्थ सतत आधुनिक विज्ञानातील लसीकरणाचा आणि प्रतिजैवकांचा हवाला देत असतात. एवढेच नव्हे तर पाश्चात्य देशांतील बरेच होमिओपॅथीचे व्यावसाईक लसीकरणाला विरोधही करतात. आता होमिओपॅथीसारख्या थोतांडावर विश्वास ठेवून आपल्या मुलांचा बळी द्यायचा की नाही हे ज्याने त्याने ठरवावे. परंतू खरी गमतीची बाब अशी, की "लसीकरणाची कार्यपद्धती" ही एकमेव वैज्ञानिक गोष्ट थोडीफार होमिओपॅथीच्या समजुतीच्या जवळ जाते, आणि तीला सुद्धा बऱ्याच पाश्चात्य होमिओपॅथी व्यावसाइकांचा विरोध आहे. स्वत:च्या हाताने स्वत:च्याच पायावर धोंडा मारून घेण्याचे यापेक्षा चांगले उदाहरण कोठे मिळेल? 
मात्र होमिओपॅथीची दुसरी समजूत याहीपेक्षा कितीतरी पटीने विचित्र आहे. ही समजूत बनवण्या पाठीमागे सुद्धा हानेमानची एक मजेशीर अंधश्रद्धा होती, परंतू या लेखापुरती आपण ती बाजूला ठेऊयात आणि ती समजूत काय आहे यावर लक्ष केंद्रित करूयात. या समजूतीनुसार, होमिओपॅथीचे औषध जसेच्या तसे दिले तर त्याचा परिणाम होत नाही किंवा उलट परिणाम होतो आणि त्यामुळे हे औषध नेहमी विरल करून, म्हणजे पाण्यात किंवा अल्कोहोलमध्ये अत्यंत कमी प्रमाणात टाकून दिले जावे. जेवढे औषध जास्त विरल तेवढा त्याचा परिणाम अधिक अशी महाअजब समजूत असल्यामुळे होमिओपॅथीचे कोणतेही औषध अत्यंत सौम्य करून मगच रूग्णाला देण्याची पद्धत आहे. या विरलीकरणाचीही एक विशिष्ट पद्धत आहे. यामध्ये मूळ औषधाचा अतिशय छोटासा अंश बऱ्याच जास्त पाण्यात (किंवा अल्कोहोलमध्ये)  टाकला जातो, आणि व्यवस्थित ढवळून ते औषध साबुदाण्यांसारख्या दिसणाऱ्या साखरेच्या गोळ्यांवर टाकून रुग्णाला दिले जाते.
होमिओपॅथीची औषधे किती विरल असतात हे समजण्याकरिता आपण, जेम्स रॅंडी नावाच्या विज्ञानअभ्यासकाने केलेली एक सोपी आकडेमोड समजाऊन घेऊ. होमिओपॅथीच्या औषधांच्या बाटल्यांवरती १००C, २००C अश्या संख्या लिहिलेल्या असतात.  या संख्या त्या औषधाची पोटेन्सी म्हणजेच परिणामकारकता दर्शवतात. आता ठराविक पोटेन्सीचे होमिओपॅथीचे औषध तयार करण्याची पद्धत साधारणपणे अशी आहे : 
एक भाग औषधी घटक घ्यायचा आणि तो ९९ (नव्व्याण्णव) भाग पाण्यात (किंवा अल्कोहोलमध्ये) टाकायचा आणि नीट ढवळायचा. हे झालं  फक्त १C चं औषध. म्हणजे १C च्या औषधा मध्ये प्रत्यक्षात औषधाचे प्रमाण असते १:१०० (शंभरात एक भाग). म्हणजेच होमिओपॅथीच्या, १C पोटेन्सीच्या १०० साखर-गोळ्या खाल्या की पोटात गेलेले एकून औषध फक्त एका गोळी एवढे असेल ! 
आता या १C औषधाचा एक भाग घ्यायचा आणि तो ९९ भाग पाण्यात टाकायचा, की तयार झालं केवळ २C चं औषध. यात औषधाचे प्रमाण असेल १:१०००० (एक भाग औषध नऊ हजार नऊशे नव्व्याण्णव भाग पाणी किंवा अल्कोहोल).
अश्याच पद्धतीने तयार केलेल्या २२C च्या औषधात औषधाचे प्रमाण असेल १:१०००००००००००००००००००००००००००००००००००००००००००० !. म्हणजेच साधारण १ थेंब औषध आणि "एकावर चव्वेचाळीस शून्ये" एवढे थेंब पाणी किंवा अल्कोहोल ! हे प्रमाण किती कमी आहे हे समजण्यासाठी एक सोपी तुलना करू: 
पृथ्वीवरच्या सर्व समुद्रांत आणि महासागरांत मिळून पाणी आहे साधारण १०००००००००००००००००० (एकावर अठरा शून्ये) इतके लिटर. म्हणजे पृथ्वीवरील पाण्यामध्ये एकूण रेणू (पाण्याचा रेणू म्हणजे पाणी ज्या कणांचे बनलेले आहे तो कण) आहेत जवळपास १०००००००००००००००००००००००००००००००००००००००००००० (एकावर चव्वेचाळीस शून्ये).  एका पाण्याच्या थेंबात साधारण १०००००००००००००००००००० (एकावर २० शुन्ये) इतके रेणू असतात. याचा अर्थ असा होतो की जर आपण जर पृथ्वीवरील संपूर्ण समुद्रात मिळून औषधाचा एक थेंब (हो फक्त एक थेंब!) टाकला आणि सगळे समुद्र व्यवस्थित ढवळून घेतले आणि मग त्यातली एक बाटली पाणी घेतले तरी होमिओपॅथीच्या मते हे अतिशय तीव्र औषध (२२C पोटेन्सीच्या १०००००००००००००००००००० पट तीव्र!) असेल आणि याला अजून बरेच विरल केल्याशिवाय घेता येणार नाही! म्हणजेच २२C चे होमिओपॅथीच्या औषध इतके विरल असते की औषधाचा फक्त एक रेणू पोटात जाण्यासाठी अगस्ती ऋषींच्या आख्यायिकेप्रमाणे सर्वच समुद्रांचे पाणी पिऊन टाकावे लागेल. साध्या नळाचे पाणी जरी एक पेला भरून प्यायले तरी यापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात रसायने व क्षार पोटात जातात.
आता हीच पद्धती आणखी पुढे नेऊन ४०C चे औषध तयार केल्यास औषधाचे प्रमाण किती असेल? तर ते असेल एक भाग औषधाला १०००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००० (एकावर ऐंशी शून्ये) एवढे भाग पाणी! या संख्येच्या प्रचंडपणाचा अंदाज येण्यासाठी, हा प्रश्न विचारतो, सबंध विश्वातल्या अणूंची संख्या किती आहे? तर तीही आहे "एकावर ऐंशी शून्ये". ४०C मध्येच इतके कमी
प्रमाण असेल तर हाच तर्क पुढे नेल्यास हेही सहज लक्षात येयील की १००C, २००C  च्या गोळ्यांमध्ये औषध असण्याची काहीच शक्यता नाही.
म्हणजेच १C, २C च्या गोळ्या खाल्या तर पोटात औषध जाण्याचा थोडा तरी संभव आहे पण १०C, १२C  च्या पुढच्या गोळ्यांत तर कोणतेही औषध नसेल. परंतू होमिओपॅथीचे व्यावसाईक तर असा दावा करतात की जेवढी पोटेन्सी जास्त तेवढा औषधाचा परिणाम जास्त. एवढेच नव्हे तर त्यांची जवळपास सर्वच औषधे ३०C पेक्षा जास्तच पोटेन्सीची असतात. शिवाय हानेमान स्वत:ही ३०C पेक्षा कमी पोटेन्सीची औषधे देऊ नयेत असे सांगत असे. होमिओपॅथी मध्ये फ्लू वरील उपचारांसाठी सर्रास वापरले जाणारे ऑसिलोकोसिनियम नावाचे औषध तर चक्क २००C चे असते. 
विरलपणा वाढवला की परिणामकारकता वाढते हाच तर्क लावायचा ठरल्यास आजिबात औषध न घेणारा रुग्णच औषधाच्या अतितिव्रतेने दगावायला हवा !
हे सर्व सांगुनदेखील आमची एक मैत्रिण असे म्हणाली होती की "आपल्या शरीरातील संप्रेरकांचं (Hormones) प्रमाण कितीतरी कमी असतं आणि तरीही ती किती परिणामकारक असतात हे होमिओपॅथीचे विरोधक कधीही विचारात घेत नाहीत". परंतू खरी गोष्ट अशी आहे, की होमिओपॅथीच्या औषधांशी तुलना करायची असेल तर शरिरातील संप्रेरकांची तीव्रता महाप्रचंडच म्हणायला पाहीजे. आम्हाला माहीत असलेल्या संप्रेरकांमध्ये सर्वांत कमी प्रमाणात आढळणारे संप्रेरक घेतले तरी रक्ताच्या एका थेंबात त्याचे १०००००००००००० रेणू आढळतात. याउलट एक थेंब तर सोडा पण अगदी पृथ्वीवरील सर्व पाण्याइतके जरी होमिओपॅथीचे औषध घेतले तरी त्यात औषधाचा एक रेणू मिळण्याची शक्यतासुद्धा जवळपास शून्य असते. त्यामुळे "काट्याने काटा निघतो" हे होमिओपॅथीचे खरेतर चूक असणारे तत्त्व थोडावेळ बरोबर आहे असे गृहीत धरले, तरीपण आपल्याला माहीत असणाऱ्या भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र यांच्या सामान्य कसोटीवर सुद्धा होमिओपॅथीची विरलनाची प्रक्रिया अजिबात टिकाव धरत नाही. आम्हाला बरेच लोक (आणि बऱ्याचदा होमिओपॅथीचे "डॉक्टरही") असे सांगत असतात की, या औषाधांचा परिणाम का होतो हे जरी माहीत नसले तरी परिणाम होतो हे नक्की आहे. तर्कसंगत बोलायचे झाल्यास असे म्हणावे लागेल की जेव्हा जेव्हा असा परिणाम दिसतो तेव्हा तो एकतर मानसिक असतो किंवा मग बऱ्याचदा डोकेदुखी जशी आपोआप बरी होते तसा असतो. 
एवढे सगळे स्पष्ट असूनदेखिल जगातील कित्येक लोक आम्ही वर सांगितलेल्या गोष्टी माहीत नसल्याने सर्रास होमिओपॅथीचा उपयोग करतात आणि स्वत:चा आणि कुटुंबाचा जीव धोक्यात घालतात. ऑस्ट्रेलिया, अमेरिका, इंग्लंड, बेल्जियम, स्वित्झरलॅंड आणि जर्मनीसारख्या देशांमध्ये होमिओपॅथीवर अत्यंत कडक निर्बंध असले तरी इतर बऱ्याच देशांमध्ये होमिओपॅथीच्या औषधांचा अब्जावधी रुपयांचा व्यवसाय उभा आहे (यात आपला भारत देश आघाडीवर आहे), आणि सर्वसामान्य लोकांना फसवण्याचा हा धंदा बिनदिक्कत चालू आहे. महाराष्ट्रात तर बऱ्याच आमदारांनी मिळून होमिओपॅथी डॉक्टरांना; ॲलोपॅथीची औषधे रुग्णांना देता येतील असा कायदा नुकताच विधिमंडळात संमत केला आहे ! यामागे या होमिओपॅथीच्या धंदेवाईकांनी विकत घेतलेल्या राजकारण्यांचा स्वार्थ उघड असला, तरी त्यातल्या त्यात समाधानाची बाब ही की होमिओपॅथी डॉक्टरांकडे जाणाऱ्या रुग्णांना आता नुसत्या पाण्याऐवजी किमान खरे औषध तरी मिळू शकेल. मात्र ज्यावेळी विज्ञानात स्वत: काम करणारी मंडळी होमिओपॅथीचे जोरदार समर्थन करताना दिसतात त्यावेळी हसावे की रडावे हेच कळत नाही.
======================================================
तळटीप : होमिओपॅथीचे समर्थन करण्याचे अनेक अयशस्वी प्रयत्न आजपर्यंत झालेले आहेत. अनेक शास्त्रज्ञांनी आटोकाट प्रयत्न करूनही त्यांना थोडेही यश मिळालेले नाही. परंतु यातला एक उल्लेखणिय प्रयोग केला होता तो "जॅक बेन्वेनीस्त" (Jacques Benveniste) नावाच्या एका फ्रेंच शास्त्रज्ञाने इ.स. १९८८ मध्ये. बेन्वेनीस्तचा (अर्थातच चुकीचा) दावा असा होता की होमिऑपॅथीच्या औषधांइतक्या प्रचंड विरल केलेल्या द्रावणामध्ये सुद्धा विरघळवलेल्या पदार्थाचे गुणधर्म शिल्लक राहतात. जसे काही ते पाणी, त्यामध्ये पूर्वी विरघळवलेल्या (आणि अतिषय विरल केलेल्या)  पदार्थांना लक्षात ठेवते. या गुणधर्माला बेन्वेनीस्तने "वॉटर मेमरी" म्हणजेच पाण्याची स्मरणशक्ती असे नाव दिले. बेन्वेनीस्तचा दाखला देऊन होमिओपॅथीचे व्यावसायिक असं सांगू लागले, की होमिओपॅथीच्या औषधांचा परिणामही वॉटर मेमरी मुळेच होतो. परंतु हा प्रयोग बेन्वेनीस्तला परत करून दाखवायला सांगितला असता त्याला तो अर्थातच जमला नाही. नंतर असेही समोर आले की बेन्वेनीस्तच्या गटामधल्या काही शास्त्रज्ञांना होमिओपॅथीच्या व्यावसायिकांनीच लाच दिली होती. वॉटर मेमरी तपासण्याचे अनेक प्रयत्न त्यानंतर झाले, परंतु असा कोणताही गुणधर्म अस्तित्वात नाही हेच वारंवार सिद्ध झाले. "वॉटर मेमरी" हा शब्दही विज्ञानाच्या क्षेत्रात आजकाल फक्त एक चेष्टेचा विषय म्हणून शिल्लक राहिला आहे.

Monday, June 22, 2015

सहर

दर्द की कंबल ओढ़े,
रात फिर से चढ़ आई...
नींद आखों में पिघलीही नहीं,
की मिटते अंदेशों की मायूस सिसकीयां,
उमड़ के आ रही है बार बार...
सपनों के सरसराहते परदे,
रोक रहें है रूह को,
इन बेशुमार सन्नाटो में घुल जाने से...

तेरी खुशमिजाज बातों का,
हर लब्ज़ सच्चा था... 
तुमने तो कहां था की,
ये मासूम महल्ले हटकर,
एक शहर बसने वाला था यहांपे...
उसका ठिकाना तो नहीं पर,
एक झील, 
जो यहांसे गुझर जाया करती थी
उसी जगह पे एक चौराहा बन गया है, 
जहांसे, बेहोशी के सैलाब बहां करते है…
वही जगह तुम्हे भुलाने के लिए
सेहबत होगी...

आजकल इस भीड़ से प्यार होने लगा है...

Wednesday, July 23, 2014

हिसाब

पता नहीं क्यों,
पर तेरे जाने के बाद,
फिरसे ये देहलीजें
मैं कभी बांध ही ना पाया...

वो नीला फरिश्ता,
जिसकी आमद का इंतज़ार करते हुए
अरसे गुज़र गये, वो आयां ही नहीं तो ?
इन दोनों जहाँनो को जोड़ती हुईं
रोशनी की ये लकीरे,
उनकी तेजी तो बदकरार है,
पर मांद लग रही है कुछ आजकल,
ये धुंद जो आँखों पर छाई है…

फिर सोचता हूँ,
ठीक ही हुवा की ये बह गयी,
कच्ची मिट्टी की तो बनी थी
 
उस पल महसूस नहीं हुवा,
पर आज तुम्हें बतां ही दूँ
की गुलाब का वो पौधा
जो तुम्ही ने लगाया था
वो भी चला गया है दहलीज के साथ
और भी कई गुज़री चीजों के हिसाब बाकी हैं
पर खैर, ये अलमारी तो है,
तेरे  आने के कई सावन छुपाएँ है मैंने उसमें

Thursday, July 17, 2014

वज़ूद

सर्द हवा के झोकों से,
लदा सा ये आसमान...
थकी हुई सी यें सांसे,
आफताब तक फ़ैली हुई,
ये बेअंजाम कायनाते,
ये सभी...
पुंछ रहे है कुछ,

उफ़क़ के इन गहरे सन्नाटों से
जमीं पर रेंगती हुए इन हसरतों से
उन सपनों से...
जो कभी इन्ही लोगों ने देखे थे...
इनके बस्तीयों की बेजान रोशनी
छूपा रही है अपने ही वज़ूद को

(Thanks Sammati, for helping me out with the title)

Tuesday, April 15, 2014

"The Hymn"

Whiffing lungs, breathing a morbid June sky
unending sieves of criss cross strings
questioning pinnacles of blood bathe existence
crumbling dreams of rotten mind
which have spilled inside the chapels
fluttering flames of Gothic lamps
tiring existence of quenched proletarian colonies
frozen orchids
and here I'm all fissured
pointlessly breathing the gray lumps of foetid June air,
one after another...

Wednesday, February 15, 2012

वर्मास्तुती


काव्य  पिळोणिया | काढिले हे सारं | पेलवेना भारं | तिच्यामारी,

सांगा तरी आम्ही | किती मारू ट्राय | झेपतच नाय | आज्याबात

कैसी पचवावी | वेदांताची पेंडी | रेड्याच्याही तोंडी | फेस यावा

सुरु केला कोणी | जीवन प्रवास | द्यावी एक त्यास | थोतरीत

मृगजळा पाठी | धावोन फुकाचं | मेंदूस उगाचं | शॉट द्यावा

कसले समास | नाही आदमास | मारिले वृत्तास | फाट्यावर 

यमकांचे गावी | जाहला सुकाळु | शब्दांचे जंजाळु | फैलावले

बंध चारोळीचे | लावितो वेदांस | कैसी या बेन्द्र्यास | बुद्धी नसे

Wednesday, June 1, 2011

विद्वानाची* लक्षणे (पुष्प पहिले)

भूमिका :
    हा लेख मार्गदर्शनपर व्हावा, अशी आमच्या संपादकांची (म्हणजे आमची) इच्छा आहे. कोणालाही मार्गदर्शन करण्यासाठी त्या विषयातले कळावे लागते, हा एक सार्वजनिक गैरसमज आहे. आपल्याला ज्या विषयातले काडीचेही ज्ञान नाही, त्या विषयावरही बोलता येते. फक्त त्यासाठी विद्वान असावे लागते. आजकालची सामाजिक  परिस्थिती पाहता, प्रत्येकाला कोणत्याही विषयावर बोलता येणे ही एक प्रातिनिधिक गरज बनली आहे. (फक्त पुण्यातच नाही, कोठेही.)  अभ्यास करून विद्वान होणे हे आजकालच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकालाच शक्य होत नाही. त्यामुळे झटपट विद्वान होण्याची सोय ही एक अत्यावश्यक गरज झाली आहे. ही गरज भागवणे हे  आम्ही आमचे सामाजिक उत्तरदायित्व समजतो. तद् नुषंगाने आणि काही रचनात्मक कार्य करावे या हेतूने प्रेरित होऊन आम्ही ही मार्गदर्शन पर लेखमाला लिहित आहोत. त्या लेखमालेचे हे पहिले पुष्प आपल्याला अर्पण करताना आम्हाला अत्यानंद होत आहे.

विद्वान म्हणजे:
           तर मुख्य विषयाला हात घालण्यापूर्वी, "विद्वान म्हणजे काय?" हे स्पष्ट करणे योग्य ठरेल. आम्ही स्वतः ही विद्वान आहोतच, परंतू "आम्ही असे", "आम्ही तसे" हे  सांगण्यापेक्षा, "विद्वान कसे" ते आम्ही सांगतो. (काय विनयशिलता आहे, वा! वा!). समजायला सोपे जावे म्हणून आम्ही ही लक्षणे संवाद स्वरूपात देत आहोत. सर्वसामान्य वाचकाला सुद्धा समजावे म्हणून संवाद बोली भाषेत लिहिलेला आहे.
           खाली दिलेला "विरुपाक्षनेत्र" आणि "शाल्वरुद्र" यांच्यातला संवाद वाचा. ("विरुपाक्षनेत्र" आणि "शाल्वरुद्र" ही नावे मोठी असल्यामुळे सोयीसाठी आपण त्यांना अनुक्रमे "पांड्या" आणि "सुभान्या" म्हणू.)**
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पांड्या उवाच:हे सुभान्या, विद्वान कैसा चाले, कैसा बोले, हे कथावे मजप्रति ...

सुभान्या उवाच:
toilet का? त्या तिकडे, उजव्या बाजूला...

पांड्या उवाच: toilet नाय रे भाऊ ,
विद्वान. म्हणजे "लै भारी" माणसाची characteristics विचारतोय मी...

सुभान्या उवाच: तुझ्या XXX, असं मराठीत बोल ना...

पांड्या उवाच: ठीके, यापुढे विचारीन, पण आता कर भुंकायला सुरुवात...

सुभान्या उवाच:पांडबा, विद्वान ओळखण्यासाठी काही ठराविक अशी कसोटी नाही रे. पण तुला समाजात विद्वान म्हणून ओळखले जायचे आहे का? तर मी मार्गदर्शन करतो.

पांड्या उवाच:ठीक आहे कर, पण सहसा चाऊस वापरावी लागणार नाही, असं बोल.

सुभान्या उवाच:सर्वप्रथम पांडबा कोणालाही झेपत नाहीत अश्या कवितांच, चित्रपटांच कौतुक करायला सुरुवात कर.
सगळ्या लोकप्रिय गोष्टींना नाके मुरडायला शिक.
दुर्बोध चित्रांच तोंड फाटेस्तोवर कौतुक कर.
सगळ्यांना आवडते त्या गोष्टींवर सडकून टीका कर.
आपण करत असलेली टीका आपल्यावरच उलटते आहे असा संशय आल्यास, प्रत्यक्षात निरर्थक असलेली परंतू लै भारी वाटणारी दोन तीन वाक्ये तयार ठेव...

पांड्या उवाच:अशी पण वाक्ये असतात? उदाहरणे दे ना!

सुभान्या उवाच:ठीक आहे ही वाक्ये लक्षात ठेव.
1) थ्री इडीयट्सच्या दिग्दर्शकास, रंगमंचीय अभिव्यक्तीला आवश्यक असलेली कलात्मक अनुभूती घेताना, व्यक्तिगत अलिप्तता जपता आलेली नाही.
किंवा,
2) लिओनार्डो दा व्हिन्चीने काढलेल्या मोनालिसाच्या चित्रातून त्याच्या सामाजिक उत्तरादायीत्वापेक्षा त्याची व्यक्तिनिष्ठता प्रकर्षाने जाणवते.
किंवा,
3) हिमेश रेशामियांच्या गाण्यावर टीका करणाऱ्या संगीतातल्या तथाकथीत जाणकारांना; त्यांच्या आवाजातली उत्कटता समजत नाही, हिमेशजी त्यांच्या आवाजामधून भांगारवाले, कल्हईवाले यांसारख्या कष्टकरी समाज घटकांचं प्रतिनिधित्व करतात. अर्थात हे समजण्यासाठी सामाजिक जाणीवा सुस्पष्ट असायला हव्यात.
वगैरे वगैरे...
......
पांड्या - पांड्या काय झालं तुला? असे केस का उपटतो आहेस? अरे अरे थांब दगड नको मारूस...लागेल!

पांड्या उवाच: ल्ये गयी, द्यील म्येरा, मनच्यली...
खल्यीबल्यी खल्यीबल्यी खल्यीबल्यी..
मुंबई - ढोपरगाव बुद्रुक, डेक्कन किंग एक्स्प्रेस,
अपने निर्धारित समय पर platform नंबर
"पंधरा हजार सातशे ब्याण्णव पूर्णांक दोन दशांश" पर आ रही है ...
याद आ रही है.. त्येरी याssद आ रही है...
कलमाडी निर्दोष आहेत, हे विरोधकांच कारस्थान आहे....
मी आहे एक शून्य आकाशाच्या आकांक्षांना ग्रासलेलं...
मूळव्याध आणि गुप्तरोगावर आयुर्वेदिक इलाज केला जाईल, संपर्क साधा...
संपर्क, संपर्क.. पंक सम्पर्के कमळ का भिकारी, धूली सम्पर्के रत्न का भिकारी, तशी तूही मग मजसवें कशी भिकारी???

सुभान्या उवाच :वाचवा वाचवा ...
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    
          तर वाचकहो, वर दिलेला उद्बोधक संवाद वाचून, विद्वान या शब्दाबद्दलच्या आपल्या संकल्पना स्पष्ट झाल्या असाव्यात अशी अपेक्षा आहे. समर्थांनी लिहिलेली जशी मूर्खांची  लक्षणे आहेत तशी विद्वानांचीही बरीच लक्षणे आहेत. (आहे, दोन्हीमध्ये फरक आहे, उगीच फालतू शंका काढू नका.) परंतू ती याच लेखमालिकेच्या दुसऱ्या पुष्पामध्ये देत आहे.
इत्यलम.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
* विद्वान हा शब्द या ठिकाणी आमचे गणिताचे मास्तर आम्हाला वापरत असत त्या अर्थी वापरला आहे.

** प्रश्न : पहिल्यांदा अभद्र नावे वापरून नंतर त्यांनाच पांड्या आणि  सुभान्या म्हणण्या ऐवजी, थेट तीच नावे का वापरली नाहीत?
उत्तर क्र. १: आमची मर्जी!
उत्तर क्र. २: त्यांची खरी नावे "विरुपाक्षनेत्र" आणि "शाल्वरुद्र" अशीच आहेत, परंतू विरुपाक्षनेत्राचे संपूर्ण नाव "विरुपाक्षनेत्र पांडूरंग लांडगे" आणि शाल्वरूद्राचे पूर्ण नाव  "शाल्वरूद्र सुभानराव कामठे" असे असल्याने शाळेत मुले त्यांना अनुक्रमे पांड्या आणि सुभान्या असे म्हणायची.
उत्तर क्र. ३: भारी भारी नावे वापरणे हेही एक विद्वानांचे लक्षणच आहे. 

Saturday, May 28, 2011

लिहिण्यास कारण की...

लिहिण्यास कारण  की ...
बरेच दिवस ब्लॉग लिहायचं ठरवत होतो इतके दिवस या मराठी 'ब्लॉगविश्वात' (हा आणखी एक आंग्लोद्भव समास, thanks पु. ल.) वाचनमात्रच होतो. अनेक रथी महारथींचे सुंदर सुंदर ब्लॉग्ज, त्यांची लेखनशैली वगैरे पाहून मलाही लिखाणाची सुरसुरी यायची. परंतू स्वतः लिहिलेले लेख वगैरे वाचून पाहिल्यावर ती जगबुडीच्या अफवांसारखी विरूनही जायची. (यालाच "परखड आत्मपरीक्षण" का कायतरी म्हणतात म्हणे). पोटापाण्यासाठी घरापासून लांब आल्यावर बराच मोकळा वेळ मिळायला लागला. खरं तर  हे वाक्य म्हणजे फुक्कटचा माज आहे, घरी असताना टाईमपासचा प्रोब्लेम नव्हता, कट्ट्यावर कधीही गेलं तरी चार दोन गंडलेले जीव तेथे असायचेच. असो, तर त्या टाईमपासला पर्याय म्हणून सर्व दिग्गजांची क्षमा मागून हा ब्लॉग सुरू करत आहे. आणि ब्लॉग वर प्रकाशित झालेल्या साहित्याचं मूल्यमापन रद्दीवाले करू शकत नाहीत, हेही एक कारण आहेच! माझी ही लुडबुड खपवून घेण्याएवढी मायमराठी सहनशीलही आहे. जमेल तसे लिहित राहीनच. आणखी एक म्हणजे हा ब्लॉग आणखी एका मित्रासोबत लिहिण्याचा विचार आहे. त्याच लिहिण्याच कारण तो लिहिलच, पण वाचकांच्या शिव्या दोघांनाही विभागून जाव्यात हा त्यामागचा सुज्ञ हेतू आहे.

हे झालं खर कारण, आता लई भारी वाटू शकणार कारण पण लिहून ठेवतो (नंतर उगीच विसरायला नको)

क्षणक्षण या जगण्यामधला,
धुंदपणाने चुंबित गेलो...
दिक्कालाचे पाश तोडूनी,
तीमीरावरती चालून गेलो... 
क्षितिजावरचा सूर्य पाहूनी 
दिवाभितांना तुडवीत गेलो...
उपेक्षा अन धिक्काराच्या;
ठेचाही मज इथे लागल्या, (प्रश्न: इथे म्हणजे कोठे?  उत्तर: फालतू प्रश्न नकोत, पुढे वाचा.) 
ठेचांचीच आताशा नशा चढतसे,
तद नशेचीच तर मी ही,
गाणी गाउनी गेलो...

(ओक्के बॉसं, मान्य करू की हे वरती लिहिलेलं सगळ, तुला होत, पण त्याचा आणि ब्लॉग लिहिण्याचा काय संबंध? "मी हे करीत गेलो", "मी ते करीत गेलो", स्वतःपुढे किती दिवे ओवाळून घेशील, लेका?)
असो, वरच्या आठ दहा ओळी अशक्य फालतू आहेत, असं माझं पुनः वाचानांती मत बनलंय. (त्या मी लिहिलेल्या असल्याने सहाजिकच आहे म्हणा.) असो, पण फालतू  असली तरी ती कविता तशीच ठेवतोय (हो, वाटत नसलं तरी कविताच आहे ती). कारण एकतर ती 'क्ष' पासून सुरू होते. अंताक्षरी खेळणाऱ्या पब्लिकची या "क्ष " मुळे कायम गोची होते. (आता ते "ळ " चं कोणीतरी मनावर घ्या राव.)
असो. जगण्याचा प्रत्येक क्षण कसा जगला, हे सांगता येण्याएवढे क्षण आलेतच कोठे आजून आयुष्यात? उगीच गुगल फुकट जागा देतंय म्हणून थापा कशाला मारा? आणि  नशेची गाणी कसली आली आहेत? मायला, इथे पूर्ण शुद्धीत असताना सुद्धा दोन ओळी धड म्हणता येत नाहीत. (किंबहुना त्या ठेच लागल्यामुळे फोडलेल्या किंकाळ्याच  वाटतात.)

असो. नमनासाठी एवढ तेल पुरेसं आहे!